मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कंटेनर पलटी, बसला धडक
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कंटेनर पलटी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. कंटेनर पलटी होताना बसला धडक दिल्याने बसमधील 6 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अपघातानंतर कंटेनर रस्त्यात आडवा असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कंटेनर पलटी झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अचानक ब्रेक लावल्याने कंटेनर पलटी झाला. कंटेनर पलटी होताच एका खासगी बसला धडक दिली. या धडकेत बस संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. बसमधील 6 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.