पुतळ्यांची रेडिओग्राफी 2 ते 5 डिसेंबर परिसरातील वाहतूक बंद
रत्नागिरी, दि. 29 रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याचे असल्याने परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. त्यामुळे सदरच्या पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असते. सुरक्षिततेसाठी दिनांक 2 ते 5 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येत आहेत, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, पोलीस अधीक्षकांकडील प्राप्त अहवालात त्यांनी 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यत नगर परिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याकामी पुतळ्याच्या परिसरातील रस्ते बंद करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या करिता दिनांक 2 ते 5 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यत रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याची असल्याने, हे काम करतेवेळी परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. त्यामुळे पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असल्याने, हे रस्ते बंद करण्यात येत आहेत.
वाहतुकीची कोंडी होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.