तीन भारतीय शास्त्रज्ञांना टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्कार जाहीर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांचा समावेश!
मुंबई : देशभरातील विविध समस्यांवर विज्ञान-संशोधनातून नावीन्यपूर्ण उपाययोजना शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी प्रतिष्ठित टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारांसाठी १६९ शास्त्रज्ञांमधून तीन शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. या तीन विजेत्या शास्त्रज्ञांमध्ये आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांचा समावेश असून येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.टाटा सन्स आणि न्यूयॉर्क ॲकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा टाटा ट्रान्सफर्मेशन हा पुरस्कार यंदा ‘सीएसआयआर’चे भारतीय शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. सी. आनंदरामकृष्णन, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक अमर्त्य मुखोपाध्याय आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे डॉ. राघवन वरदराजन यांना जाहीर झाला आहे.
१८ राज्यांमधील १६९ शास्त्रज्ञांचे अर्ज या पुरस्कारांसाठी आले होते, त्यातून या तिघांची निवड करण्यात आली आहे. दोन कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.पर्यावरणाचे रक्षण आणि कमी उत्पादन खर्च हे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांनी विकसित केलेल्या एनए-आयन बॅटरी तंत्रज्ञान संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर मधुमेहींमधील रक्तशर्करेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) कमी असलेल्या अनेक आवश्यक पोषक घटकांचा वापर करून एक पौष्टिक पुनर्रचित तांदूळ विकसित करणाऱ्या डॉ. सी. आनंदरामकृष्णन यांच्या संशोधनामुळे जगभरातील २ अब्ज कुपोषितांना दिलासा मिळणार आहे.
या संशोधनासाठी त्यांना टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्कार जाहीर झाला आहे. आरएसव्ही या श्वसनाच्या विषाणूंमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी किफायतयशीर किंमतीत प्रभावी लस विकसित करण्याच्या संशोधनाची दखल घेत डॉ. वरदराजन यांना टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.