काँग्रेस पक्ष अखेर भाकरी फिरविणार? संघटनेत तातडीने बदलाची मागणी!
नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा देऊ केलेल्या राजीनाम्याचा सोक्षमोक्ष अद्याप लागलेला नाही. मात्र, पक्ष नेतृत्वाने याबाबत आस्ते कदम भूमिका घेण्याऐवजी संघटनेत तातडीत बदल करावा आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणारे नवे नेतृत्व आणावे, अशी मागणी पक्षातून सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राज्यात संघटनात्मक बदलाचे स्पष्ट संकेत दिले होते. महाराष्ट्रात पक्षात सुधारणेसाठी पावले उचलले जातील.केंद्रातील नेते राज्यातील नेत्यांसमवेत चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे जयराम रमेश म्हणाले होते. त्याचा दाखला देत काँग्रेस संघटनेशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी पराभवाची नेमकी कारणे केंद्रातील नेत्यांचा कानावर घातली आहेत.या सूत्रांनी सांगितले, की लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच नाना पटोले यांच्या कार्य पद्धतीबद्दल तक्रारी सुरू होत्या.
पश्चिम महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे मुंबई आणि विदर्भातील नेत्यांकडूनही सातत्याने तक्रारी आल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये नाना पटोले यांना समज दिली होती.मात्र, राहुल गांधींनी लावून धरलेले जातीनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांमुळे ओबीसी चेहरा असलेल्या नाना पटोले यांना लगेच हटविता येणार नाही, असा पवित्रा नेतृत्वाने घेतला होता. यानंतर महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या चर्चेमध्ये नाना पटोलेंच्या भूमिकेवरून शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही मित्र पक्षांनी संतप्त पवित्रा घेतल्यानंतर जागा वाटपाच्या वाटाघाटींमधून नाना पटोले यांना बाजूला करून बाळासाहेब थोरात यांच्याकडे सूत्रे देण्यात आली होती, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १३ जागा जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दणदणीत यशाची अपेक्षा असताना महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यात काँग्रेसला केवळ १५ जागा जिंकता आल्या. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत येऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.या भेटीमध्ये पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे काँग्रेसच्या एका खासदाराने स्पष्टपणे सांगितले होते. सोबतच खिळखिळी झालेली पक्ष संघटना सावरण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणाऱ्या व त्यांचे मनोधैर्य वाढविणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याची गरज बोलून दाखविली. महाराष्ट्रात मोठ्या जात समुहाकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला परवडणारे नसल्याची सूचक टिप्पणीही केली.