संसदेत पहिला दिवस गोंधळाचा; दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब!
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी अदानी प्रकरणावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज सुरू होताच काही मिनिटांमध्ये सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. सकाळच्या सत्रामध्ये लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी समूहाच्या लाचखोरी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळत कामकाज चालवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम २६७ अंतर्गत अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. मात्र, अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल झाला असून त्यावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही, असे सभापती जगदीप धनखड यांनी केले. त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूूब करण्यात आले.
पहिल्याच दिवशी सभागृह तहकूब करावे लागल्यानंतर बिर्ला यांनी तातडीने लोकसभेतील गटनेत्यांची बैठक घेतली. अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते. पण, गदारोळामुळे कोणतीही सकारात्मक चर्चा होत नाही. त्यामुळे विरोधकांनी सभागृह चालवण्यासाठी सहकार्य करावे. सभागृहात घोषणाबाजी वा फलकबाजी करू नये, असे आवाहन बिर्ला यांनी केले.