काही विशेष हित समूह दबाव आणून निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात-माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
साेशल मीडियाचा वापर करुन काही विशेष हित समुहांकडून न्यायालयाच्या निकालांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. न्यायाधीशांनी त्यापासून सावध राहायला हवे, असा इशारा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला.राज्यघटनेशी संबंधित एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
न्या. चंद्रचूड म्हणाले की, काही विशेष हित समूह दबाव आणून निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. काेणत्याही निर्णयाचा आधार काय आहे, हे प्रत्येक नागरिकाला हे समजून घेण्याचा अधिकार आहे. तसेच निर्णयावर स्वत:चे मत व्यक्त करण्याचाही अधिकार आहे. मात्र, त्यापलिकडे जाऊ न्यायाधीशांना लक्ष्य केले जाते, तेव्हा प्रश्न पडताे की, हे खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? यातून एक गंभीर धाेका निर्माण हाेऊ शकताे. काॅलेजियम पद्धतीबाबत गैरसमज आहेत. मात्र, न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेचा प्राधान्याने विचार करायला हवे, असे न्या. चंद्रचूड म्हणाले.
आजकाल लाेक युट्यूब किंवा इतर साेशल मीडियावर पाहिलेल्या २० सेकंदाच्या व्हिडीओच्या आधारे मत बनवितात. हा न्यायव्यवस्थेसाठी फार माेठा धाेका आहे. न्याधीशांना ट्राेल करुन निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला जाताे. यापासून सावध राहायला हवे, असे न्या. धनंजय चंद्रचूड म्हणालेन्यायाधीशांनी राजकारणात प्रवेश करायला हवा का? या प्रश्नावर न्या. चंद्रचूड म्हणाले की, कायद्यानुसार यावर काेणतेही बंधन नाही. समाज तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरही न्यायाधीशाच्या रुपात पाहताे. जे काम इतर नागरिकांसाठी ठीक आहे, ते न्यायाधीशांसाठी पदावरुन हटल्यानंतरही ठीक नाही. माझे काम आणि न्यायपालिकेच्या प्रामाणिकपणावर संशय निर्माण हाेईल, असे काेणतेही काम मी ६५ वर्षांचा झाल्यानंतर करणार नाही, असे सांगत आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे संकेत दिले.