अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाईल : इरोशनी गलहेना
विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी सुरू केलेल्या या संमेलनातून जागतिक प्रेमाची आणि मानवतेची बांधणी होईल तसेच जगातील अनेक देशातील साहित्य व संस्कृती यांचा मिलाफ होऊन जागतिक मैत्रीचा प्रसार सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या २६व्या अक्षरयात्री भारत-श्रीलंका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना इरोशनी गलहेना यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आयोजक माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि कवयित्री डॉ. स्वाती शिंदे – पवार यांच्यामुळे दोन देशातील साहित्यिकांच्या विचारांचे आदान-प्रदान आज होत आहे. सबुद्धी प्रतिष्ठान, श्रीलंका सरकार, अनेक विद्यापीठांचे विभागप्रमुख यांच्यासह आम्ही केलेली ही भारताची सांस्कृतिक पाहणी फारच आनंददायी आहे.यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या अरुमुगम निरोमी यांनी भारत-श्रीलंका साहित्यिकांचे एकत्रित येणे प्रेरणादायी असून भारतीय स्त्रिया खूप धाडसी असल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्रातील स्त्रियांची एकजूट आणि त्यांचे साहित्यातील योगदान महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.संमेलनाचे उद्घाटक प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, अक्षरयात्री प्रतिष्ठान आणि विश्व साहित्य संस्कृती चळवळ यांच्यामुळे पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये हे संमेलन भरते आहे, याचा मनस्वी आनंद आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा डॉ. स्वाती शिंदे-पवार या नावाचा उल्लेख करावाच लागेल. या साहित्य संमेलनाने भारतीय संस्कृतीचा जागर जागतिक स्तरावर केला आहे.
स्वागताध्यक्षा सुनिताराजे पवार यांनी श्रीलंकेहून आलेल्या टीमचे व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, अक्षरयात्रीची साहित्य संमेलने मी पाहिली आहेत. या संमेलनातून ओसंडून वाहणारा उत्साह मी अनुभवला आहे. स्त्रीशक्तीचे उत्तम दर्शन हे संमेलन घडविते.या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातील ऐंशीहून अधिक साहित्यिकांनी हजेरी लावली होती. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून सुरू झालेली अक्षरयात्री साहित्य संमेलनाची चळवळ ग्रामीण भागातून आता विश्व साहित्य संस्कृतीकडे झेपावली आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन गतवर्षी नेपाळ येथील दुतावासामध्ये संपन्न झाले होते. २५ भाषांतील बहुभाषिक मान्यवर साहित्यिकांनी यामध्ये आपल्या सहभाग नोंदविला होता.