
चिपळूण येथे सोमवारी ‘ग्रंथालय मित्र’ मेळावा ग्रंथप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन.
चिपळूण :: ग्रंथव्यवहार नवनवीन तंत्रसुविधांमुळे अडचणीत आहे. त्याचा परिणाम ग्रंथालयांवर होत आहे. ग्रंथालयांचा लोकाश्रय कमी होत आहे. या परिस्थितीत काय करावे? ग्रंथालयांना काही नवे रूप धारण करता येईल का? अशा विविध अंगांनी उपाययोजनेचा विचार करण्याकरता आज (सोमवार, 25 नोव्हेंबर) शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘ग्रंथालय मित्र’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. तानाजीराव चोरगे (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांच्याहस्ते होणार आहे. ‘ग्रंथालये सांस्कृतिक केंद्रे होऊ शकतील?’ या संवादसत्राची सुरुवात, ठाण्याचे उद्योजक, लेखक व ग्रंथप्रेमी गिरीश घाटे यांच्या निवेदनाने होईल. नंतर चर्चा उपस्थितांना खुली असेल. अध्यक्षस्थानी डॉ. यतीन जाधव (अध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर) असतील. चर्चा वेगवेगळ्या सत्रांमध्ये होईल. समारोप डॉ.माधव बापट (प्राचार्य, दातार, बेहेरे, जोशी महाविद्यालय, चिपळूण) हे करतील. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन आणि थिंक महाराष्ट्र पोर्टलचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार लेखक दिनकर गांगल या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
याच तऱ्हेचे मेळावे येत्या काही महिन्यांत दक्षिण कोकण, गोवा, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या भागांत घेण्याचे नियोजन आहे. चिपळूणला होणाऱ्या दिवसभराच्या या चर्चासत्रात ग्रंथप्रेमी आणि वाचकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश देशपांडे, विनायक ओक (लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण) आणि सुधीर बडे (प्रवर्तक, गावोगावी ग्रंथालय मित्र मंडळे मोहीम ठाणे) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी फोन नंबर 9423831668 येथे संपर्क साधावा.