मागील १३ वर्षापासून सुरू असलेल्या महामार्गाची वर्षअखेरची नवी डेडलाईनही हुकणार?
मागील १३ वर्षापासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामागांचे काम अजूनही संथगतीनेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमुळे महामार्गाच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्षच झाले आहे. यामुळे महामार्गाच्या पूर्णत्वाची वर्षअखेरची देण्यात आलेली नवी डेडलाईन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत बिकट मार्गातूनच वाहनचालकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण होणार कधी अन डेडलाईन नेमक्या थांबणार कधी या सर्व प्रश्नांनी कोकणवासियांना भंडावून सोडले आहे.
पनवेल ते झाराप-पत्रादेवी या ४५० कि.मी. लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास २०११ मध्ये सुरूवात झाली. ११ टप्प्यातील कामांपैकी १० टप्प्यांची म्हणजेच ८४ कि.मी. अंतरापर्यंतची जबाबदारी राज्य सरकारच्या सार्वत्रिक बांधकाम विभागाकडे आहे. तर ० ते८४ कि.मी. म्हणजेच पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आहे.
या महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेत ताशेरेही ओढले होते. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर ३१ जानेवारी २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी हमी राज्य सरकारने न्यायालयात दिली होती. ही हमीही केंद्र व राज्य सरकारला पाळता आलेली नाही. www.konkantoday.com