महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी एसटी वाहकास अटक
एसटी बसमधून प्रवास करणार्या महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थिनीशी ओळख करुन तिला लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी सावंतवाडी एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत गिरीश अशोक घोरपडे (40, रा.भेडशी-दोडामार्ग) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.यातील पीडित विद्यार्थिनी ही महाविद्यालयात शिकत असून ती नेहमी एसटी बसमधून प्रवास करते. याचाच फायदा घेत वाहक गिरीश घोरपडे याने तिच्याशी जवळीक करत ओळख वाढविली. तिच्या अज्ञानाचा फायदा घेत लॉजवर नेऊन अत्याचार केले.
काही महिन्यांनंतर त्या विद्यार्थिनीचे मानसिक संतुलन बिघडले त्यामुळे तिची प्रकृती खालावली.तिला उपचारासाठी बांबोळी-गोवा रुग्णालयात 2 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला विश्वासात घेत चौकशी केली असता हा सर्व प्रकार तिने कथन केला.त्यावरुन सावंतवाडी पोलीसांनी वाहक गिरीश घोरपडे यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी तातडीने कारवाई करत संशयीतला ताब्यात घेतले. त्याने या गुन्हयाची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधिकारी मुळीक यांनी दिली. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.