चिपळूण शहरातील पेठमाप-मुरादपूर पुल पूर्ण होणार.
चिपळूण शहरातील अत्यंत महत्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम पर्याय ठरणार्या पेठमाप मुरादपूर पुलाच्या कामाने पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा गती घेतली आहे. या पुलाचे काम मार्च २०२५ पर्यंत मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्या पिलरवर गर्डर चढविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेली आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आता देखील काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात. परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्गदेखील बंद पडतो. साहजिकच परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा, अशी मागणी नागरिक कित्येक वर्ष करीत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर-पेठमाप असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. www.konkantoday.com