स्मृती भ्रंश टाळण्यासाठी ज्येष्ठांनी नैराश्य टाळून जीवनातील बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे मनोविकार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे यांचे कुवारबाव येथे ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमात आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी : स्मृती भ्रंश हा 65 वर्षावरील ज्येष्ठांना सर्वव्यापी मानसिक आजार असून तो टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी नियमित व्यायाम, योगाभ्यास, प्राणायाम, ध्यानधारणा, संतुलित आहार, निर्मितीक्षम छंदांची जोपासना, सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग वाढवावा आणि नैराश्य चिंता विसरून जीवनातील बदलांना सकारात्मक कृतीने सामोरे जावे, असे आवाहन मनोविकार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे यांनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघात मार्गदर्शन करताना केले.कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघात एक ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ख्यातनाम मनोविकार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे यांनी जेष्ठांमधील सर्वव्यापी स्मृति भ्रंश या मानसिक आजाराविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे माहिती देताना वेगाने बदलणारी सामाजिक परिस्थिती, व्यसनाधीनता, मेंदूचे आजार कारणीभूत ठरत असल्याने त्यावर मात करण्यासाठी भक्ती, कर्म, ज्ञान या आध्यात्मिक शोधाचे मार्ग स्वीकारून वर्तमानातील क्षणांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ज्येष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले. प्रारंभी श्यामसुंदर सावंत देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ही संयुक्त राष्ट्र संघाने सुमारे 50 वर्षा पासून अमलात आणलेली संकल्पना असून ती जगातील प्रत्येक राष्ट्रात राबविली जाते. भारतातही आता ज्येष्ठांसाठी नवे ज्येष्ठ नागरिक धोरण अमलात आणून ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आर्थिक तरतुदीसह नव्या योजना राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात आले. श्री. दिलीप कुमार साळवी यांनी भक्ती गीतातून योजना वाढदिवस शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, प्रकाशराव शिंदे, प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर कासेकर आदींनी चर्चेत भाग घेऊन जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना विषयी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाने ही राज्यासाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन केल्याबद्दल शासनाला धन्यवाद दिले. शेवटी डॉक्टर मनोहर शेंडगे यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने या जागतिक आरोग्य दिनाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.