चिपळूणमध्ये समुदाय संसाधान व्यक्तींना मोबाईल वितरण नव्या प्रांत कार्यालयात आणि बसस्थानकात बचतगटांसाठी विक्री केंद्र – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, : जिल्ह्यात 5 प्रांत कार्यालयाच्या नव्या इमारतीत आणि एमआयडीसीकडून नव्याने बांधण्यात येणाऱ्या बसस्थानकांमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंसाठी विक्री केंद्र म्हणून एक गाळा उपलब्ध करुन दिला जाईल. यासाठी अट एकच आहे, हे उत्पादन स्वत:चे असावे, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. चिपळूण येथील रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सभागृहात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये कार्यरत समुदाय संसाधान व्यक्तींना स्मार्ट मोबाईलचे वितरण पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, महिला बचत गटांना सक्षम करणे, त्यांना ताकद देणे यावर जिल्हा नियोजन समिती बैठकीत सर्वांचे एकमत झाले. स्वत:चा मोबाईल असेल तर बचत गटांची चळवळ मोठी वाढविणे सोपी जाईल. या चळवळीमध्ये महिलांची आर्थिक उन्नती घडते. त्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल वितरण होत आहे. ग्रामसंघांच्या इमारती दिल्या आहेत. महिला बचत गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र देखील असणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादने स्वत: तयार केली पाहिजेत. त्याचे मार्केटींग, पॅकेजिंग करत नाही, तोपर्यंत वस्तूंना मागणी वाढणार नाही. ज्यादिवशी महिलांचे उत्पादन मोठ्या मॉलमध्ये विक्रीस जातील, त्यादिवशी या मोबाईल वितरणाचे सार्थक झाले असे समजू. अंगणवाडी सेविकांना ५ हजार, मदतनिसांना ३ हजार वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेती सेवकालाही पैसे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या विकासाचा निर्णय घेण्याची ज्यावेळी वेळ येते. त्यावेळी आम्ही एकत्र असतो. राज्यातही जनतेच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येकांनी एकत्र आले पाहिजे, असा संदेश आजचा कार्यक्रम देईल, असेही पालकमंत्री म्हणाले. आमदार श्री. जाधव म्हणाले, सीआरपींना मोबाईल देण्याचा विषय डीपीसीमध्ये आला. सर्वांनी त्याला पाठींबा दिला. त्यासाठी २ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. प्रभाग संघाच्या इमारती मतदार संघात ५ उभे राहणार आहेत. जिल्ह्याच्या विकासात सगळे मिळून एकत्र काम करु. आमदार श्री. निकम म्हणाले, पावसाळ्यामध्ये प्रशासनाने जागृतपणे लक्ष ठेवल्याने चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती आली नाही. महिलांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याचे शासनाचे काम पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून होत आहे. त्यातूनच आज मोबाईल वितरण कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. चिपळूण व गुहागरमधील सीआरपींना प्रातिनिधी स्वरुपात मोबाईलचे वितरण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ व्यक्तींना गुलाब पुष्प देऊन, ज्येष्ठ नागरिक दिनही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.000