रत्नागिरीत २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजनदेवराई भ्रमंती, रत्नागिरी जिल्ह्यात आढळणाऱ्या ३०० हून अधिक प्रजातींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, तज्ञांचे मार्गदर्शन यांसारखे विविध उपक्रम.
रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे संपूर्ण जगात साजऱ्या होणाऱ्या वन्य जीव सप्ताहानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्यामार्फत २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त निसर्ग यात्रा, देवराई भ्रमंती, रत्नागिरी जिल्ह्यात आढळणाऱ्या ३०० हून अधिक प्रजातींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, वन्यजीव बचाव क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांचे मार्गदर्शन, शाळा महाविद्यालय जनजागृती अभियान असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम वन विभाग रत्नागिरी, लेन्स आर्ट रत्नागिरी, सृष्टीज्ञान, रेन ट्री फाउंडेशन, रेस्क्यू पुणे, निसर्ग सोबती, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थांच्या सहभागातून आयोजित करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अपार जैव विविधतेची आणि इथल्या संपन्न अधिवासांची माहिती सर्वांना व्हावी आणि नागरिक, मुले, युवक यांना आपल्या परिसरात आढळणाऱ्या प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक, सरीसृप, फुलपाखरे, सागरी जीव तसेच त्यांचा अधिवास याबद्दल जागरूक करता यावे हे या कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३०० हून अधिक प्रजातींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लेन्स आर्ट रत्नागिरी या ग्रुपच्या माध्यमातून याप्रसंगी देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामधील स. का. पाटील सभागृहात ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे. फोटोग्राफी आणि संवर्धन कार्यात लोकसहभाग वाढावा यासाठी रत्नागिरी आणि देवरूखमधील विविध शाळांमध्ये मार्गदर्शन आणि जनजागृती अभियान यानिमित्त सुरू करण्यात येणार आहे. उद्या (२ ऑक्टोबर) पोमेंडी (रत्नागिरी) येथील देवराई भ्रमंतीने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. दि. ४ ऑक्टोबर रोजी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सकाळी १० वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन चिपळूणच्या वन अधिकारी गिरीजा देसाई, एसीएफ (चिपळूण) प्रियांका लगड, आरएफओ (रत्नागिरी) प्रकाश सुतार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. हे छायाचित्र प्रदर्शन ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल. ६ ऑक्टोबर रोजी पुणे येथील रेस्क्यु संस्थेचे संचालक डॉ. नचिकेत उत्पट वन्यजीव बचावविषयक मार्गदर्शन करतील. हे व्याख्यान निसर्गभान व्याख्यान मालेच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे. सकाळी ११ वाजता सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्या यूट्यूब चॅनल वर हे व्याख्यान ऐकता येणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रामस्थ, सुजाण नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी या अनोख्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रतीक मोरे (७७९८२३३२४३) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन याप्रसंगी आयोजकांनी केले आहे.