चिकुनगुन्याचा धोका वाढताच राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! पुणे : पुण्यासह राज्यभरात चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याचबरोबर रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत असून, गंभीर गुंतागुंत आढळून येत आहे. यामुळे चिकुनगुन्याच्या विषाणूत झालेला बदल तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
चिकुनगुन्याच्या काही रुग्णांमध्ये जीवघेणी लक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यात अर्धांगवायू आणि तोंडावर, कानावर काळे चट्टे येणे या प्रकारची लक्षणे दिसून येत असल्याचा दावा काही रुग्णालयांनी केला आहे. याआधी राज्यात २००६, २०१०, २०१६ या वर्षांमध्ये चिकुनगुन्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्या वेळी काही रुग्णांमध्ये शरीरावर काळे चट्टे आल्याचे दिसून आले होते. दर पाच ते सहा वर्षांनी चिकुनगुन्याची साथ येते. यंदा रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत असून, तपासणी अहवालही निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे जनुकीय क्रमनिर्धारण करून या विषाणूमध्ये झालेला बदल तपासला जाणार आहे.राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात चिकुनगुन्याच्या विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे. विषाणूचे जुनकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांकडून रक्त नमुने घेण्यात येणार आहेत. रुग्णालयांनी एका रुग्णांचे दोन रक्तनमुने घ्यावेत आणि एक रक्तनमुना एनआयव्हीला, तर दुसरा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवावा. तसेच, गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचेच रक्तनमुने घ्यावेत आणि ते पाच दिवसांच्या आत तपासणीसाठी पाठवावेत, अशा सूचना आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना केल्या आहेत.चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये जीवघेणी लक्षणे दिसत असल्याचा दावा काही रुग्णालयांनी केला आहे. या प्रकरणी या रुग्णालयांकडे माहिती मागविण्यात आली आहे. आरोग्य विभागाला अद्याप तरी चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वेगळी लक्षणे दिसून आलेली नाहीत. *– डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य विभाग*पुण्यात चिकुनगुन्याचे २२७ रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी रुग्णालयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सर्व रुग्णालयांना सूचना देण्यात येणार आहेत. *– डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका*