गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा रत्नागिरी-आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू.
गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा रत्नागिरी-आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. आत्माराम शरद सावंत (वय ३०, रा. मुणगे, सावंतवाडी ) असे या तरूणाचे नाव आहे.मेंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास करताना ही घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी, मुणगे-सावंतवाडी येथील आत्माराम सावंत हा तरूण गेली सात वर्षे मुंबई- जोगेश्वरी येथे राहत असून मुंबईतील एका खासगी वाहनांवर चालक म्हणून तो काम करत होता. गणेशोत्सवानिमित्त शनिवारी (दि.१५) पहाटे मेंगलोर एक्सप्रेसने तो मुंबईतून कणकवलीला येत होता. रत्नागिरी-आरवली प्रवासादरम्यान रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. व मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. आत्मारामच्या मृत्यूमुळे मुणगे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.