हिंदुत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायउतार व्हावे-अभिनेते शरद पोंक्षे.
लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारले आहे. या आधी स्वबळावर सत्तेत असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी एनडीच्या कुबड्यांची गरज भासली आहे. तसेच मणिपूरसह अनेक मुद्द्यांवर संघानेही भाजपला चांगलेच सुनावले आहे.त्यातच आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदुत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायउतार व्हावे, असे विधान केले आहे. तसेच ‘सब का साथ, सब का विकास’मुळे मळमळायला लागलं, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सांगलीतील एका कार्यक्रमात पोंक्षे यांनी याबाबतचे मत व्यक्त केले.आतापर्यंत आपल्या देशावर अनेकांनी आक्रमणे केली. मात्र, कोणालाही हिंदू धर्म संपवता आला नाही. हे सत्य असले तरी आता या कल्पनेत कायम राहू नये. देशाला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पायउतार होण्याची गरज आहे. मोदींनी पायउतार होत देशाचं नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं, असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. ‘भारत: काल, आज आणि उद्या’ या विषयावर त्यांनी हे मत व्यक्त केले.