माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. श्वसन मार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.**सीताराम येचुरी यांची राजकीय कारकिर्द*सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलनं झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला होता.सीताराम येचुरी यांनी १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. १९७७-७८मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. प्रकाश करात यांच्यासह सीताराम येचुरी यांनी त्या काळात जेएनयूमधील डाव्या विचारप्रवाहाचं नेतृत्व केल्याचं मानलं जातं.१९८४ साली सीताराम येचुरी माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. पॉलिट ब्युरोमध्ये त्यांचा प्रवेश झाला. २०१५ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाले. यादरम्यान त्यांनी तब्बल १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं. या काळात त्यांनी कामगार, मागासवर्ग, मध्यमवर्ग यांचे अधिकार यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button