चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन
रत्नागिरी, दि. 11 (जिमाका) : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.* जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात सुरु आहे. गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी गौरी-गणपतींचे विसर्जन होणार असून त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतील. एसटी महामंडळाने जादा फेऱ्यांद्वारे मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे येथे जाण्याकरिता जवळपास 2553 फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ऑनलाईन बुकींगप्रमाणे यावर्षी ग्रुप बुकींगलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुहागर तालुक्यातून ग्रुप बुकींगला सर्वाधिक म्हणजे 208 गाड्यांचे बुकींग करण्यात आले आहे. गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. दि. 12 सप्टेंबरला 187 बसेस, दि. 13 सप्टेंबरला 832 बसेस, दि. 14 सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे 929 बसेस सोडण्यात येणार आहेत. दि. 15 सप्टेंबरला 331, दि. 16 सप्टेंबरला 108, दि.17 सप्टेंबरला 83, दि. 18 सप्टेंबरला 80 फेऱ्या सोडल्या जातील.दि. 19 व 20 सप्टेंबरला सुध्दा फेऱ्या सोडण्यात येणार असून त्याचे आरक्षण सुरु आहे. या परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येक आगारात अन्य आगारातून आलेल्या जादा एसटी बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्या त्या आगारांच्या बसेसचा उपयोग केला जाणार आहे. बाहेरील आगारातून आलेल्या 735 बसेस, जिल्ह्यातील 108 बसेसच्या माध्यमातून 2553 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.