बलात्काराच्या गुन्ह्याखाली जन्मठेप भोगत असलेल्या आसाराम बापूची पुन्हा जोधपूरला रवानगी.
स्वयंघोषित संत आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली जन्मठेप भोगत असलेल्या आसाराम बापूची पुन्हा जोधपूरला रवानगी करण्यात आली आहे. नराधम आसाराम बापूवर खालापूर तालुक्यातील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणले होते.वास्तविक त्याच्यावर 6 दिवस उपचार केले जाणार होते. प्रत्यक्षात 12 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर आसाराम बापूची पुन्हा जोधपूरमधील जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकृतीच्या फेरतपासणीसाठी आसारामला पुन्हा एक महिन्यानंतर बोलावण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते.अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू राजस्थानमधील जोधपूर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आसाराम बापू (85) याला बलात्काराच्या प्रकरणात सप्टेंबर 2013 मध्ये अटक झाली होती. त्याला हृदयरोग, थायरॉई़ड या सारख्या आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसार आसाराम बापूला महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती.