सिंधुदुर्ग जिल्हयात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ.
सिंधुदुर्ग जिल्हयात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावरच डेंग्यू साथीच्या आजाराचे रुग्ण मोठया संख्येने सापडत असल्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे.जिल्हयाचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हयात आतापर्यंत १३४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणी शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.डेंग्यू बरोबरच मलेरिया साथीचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात सर्वात जास्त डेंग्यूचे रुग्ण कुडाळ तालुक्यात आढळले असून रुग्णांची वाढती संख्या ऐन सणासुदीच्या काळात आरोग्य विभागाची चिंता वाढवत आहेत. सध्या जिल्हयात टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू या संसर्गजन्य आजाराची साथ पसरली आहे. कित्येक रुग्णांवर उपचार सुरु असून शासकीय हॉस्पिटल त्याचबरोबर गोवा-बांबोळी रुग्णालयात देखील डेंग्यू व मलेरियाच्या गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हयात आतापर्यंत १३४ एवढे डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत तर मलेरियाचे ५२ रुग्ण तपासणीत पॉजिटिव्ह आले आहेत.