महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करावे रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु, अद्याप आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबरपर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी. सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी 7 सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे, त्याबाबत लघु संदेश शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रोत्साहनपर लाभासाठी 28876 कर्जदार शेतकऱ्यांचे खाती अपलोड केली आहेत. त्यापैकी 17949 कर्जदार शेतकऱ्यांचे खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 16939 आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असून 4 सप्टेंबर 2024 अखेर 806 कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करणे प्रलंबित आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केल्यापैकी 16267 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खाती रु. 32.42 कोटी इतकी रक्कम शासनामार्फत अदा करण्यात आली आहे. तरी या याजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बाकी असलेल्या सर्व 806 जणांनी 7 सप्टेंबर पर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.000