गुरुवारी पहाटेपासूनच मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी.
* अवघ्या काही तासांमध्येच गावागावात, घराघरात गणपतीच्या आरतीचे सूर कानी पडणार असून, याच मंगलमय वातावरणाचे साक्षीदार होण्यासाठी सध्या अनेक चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. पण, त्यांची ही वाट मात्र अपेक्षेहून मोठी असणार आहे. कारण, गुरुवारी पहाटेपासूनच मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्रीपासून महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं. या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी अडकले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढताना दिसत आहे. साधारण तासाभरापर्यंत वाहनं जागीच ठप्प असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. सध्या दोन्ही मार्गिकांवर वाहनं आल्यामुळं महामार्गावर ही कोंडीची समस्या उद्भवली असून, ही कोंडी जवळपास 6 ते 7 किमीपर्यंत आहे.