नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार? याविषयी अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत नंतर घोषणा केली जाईल, असा उल्लेख निवडणूक आयोगानं केला. मात्र, याबाबत अद्याप निवडणूक आयोगानं कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.केंद्रीय निवडणूक आयोगानं गेल्या महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीर व हरियाणा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार, १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणुका आणि त्यांचे निकाल लागणार आहेत. त्याचवेळी हरियाणामध्ये एकाच टप्प्यात राज्यभरातील मतदारसंघामध्ये मतदान होऊन त्यांचेही निकाल जम्मू-काश्मीरबरोबरच लावले जातील. आधी १ ऑक्टोबर रोजी हरियाणात मतदानाची तारीख जाहीर केली होती. मात्र, नंतर त्यात बदल करून ती ५ ऑक्टोबर करण्यात आली आहे.*महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधानदरम्यान, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखांबाबत निवडणूक आयोगानं कोणतीही ठोस माहिती दिली नव्हती. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलल्याचाही उल्लेख आयोगानं केला. मात्र, आता खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच राज्य विधानसभा निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे. दिलीप लांडेंबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकांमध्ये विजयी करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. तेव्हा त्यांनी निवडणुकांच्या तारखांचा संदर्भ दिला. “आता दोन महिन्यांत निवडणुका आहेत ना? नोव्हेंबरमध्ये. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रचंड मताधिक्याने दिलीप लांडेंच्या मागे उभं राहायचं”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.*विरोधकांवर टीकास्र*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार दिलीप लांडे यांनी आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर तोंडसुख घेतलं. “कुणी कितीही आकांडतांडव केलं तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ते म्हणतात दीड हजार रुपयांत काय होणार? तुम्ही काय त्यांना भीक देताय का म्हणे. बोलायला लाज तरी वाटली पाहिजे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार? पण दीड हजार रुपयांची किंमत माझ्या माता-भगिनींना आणि मला माहिती आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.“मी दीड हजारावर थांबणार नाही. तुम्ही सरकारचं बळ वाढवलं तर दीड हजाराचे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील, तीन हजाराच्या पुढेही आम्ही जाऊ. कारण हे देणारं सरकार आहे”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.