कशेडी घाटातील दुसरा बोगदा वाहतुकीसाठी सज्ज
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रेंगाळल्यामुळे यावर्षीही गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्या पोलादपूर ते खेड दरम्यानच्या कशेडी घाटातील दुसरा बोगदा वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. कशेडी घाटात दोन किलोमीटर लांबीचे समांतर दोन बोगदे तयार झाल्याने कोकणातील दळणवळण सुविधेत मोलाची भर पडली आहे. कशेडी घाटातील बोगदा गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी दिली. यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी घाटात दोन किलोमीटर लांबीचे समांतर दोन बोगदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार काही वर्षांपासून या बोगद्याचे काम सुरू होते. या बोगदाच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी वेळोवेळी पाहणी केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात मुंबईकर चाकरमान्यांसाठी कशेडी बोगदा मुंबईकडून येताना एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, गणेश विसर्जनानंतर या बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आली. नंतर उर्वरित काम हाती घेण्यात आले. या कामानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. दरम्यान, या वर्षीच्या पावसाळ्यात बोगद्याला गळती लागल्याचे समोर आले. परंतु, आता बोगद्याचे दुतर्फा काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुतर्फा बोगद्यातून गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू होणार असल्याने गणेश भक्तांचा प्रवास सुकर होणार आहे