ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुहासिनी देशपांडे यांचं दुःखद निधन
पुण्यातील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुहासिनी देशपांडे यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्काच बसला आहे.सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या 12 वर्षांपासून कला क्षेत्रात कामाला सुरुवात केली व गेल्या 70 वर्षात त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटात लक्षणीय भूमिका केल्या आहेत. दमदार अभिनय कौशल्यानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. मात्र आज त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.सुहासिनी देशपांडे यांच्या गाजलेल्या चित्रपटात देवकीनंदन गोपाला, वारसा लक्ष्मीचा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, पुढचं पाऊल, आज झाले मुक्त मी, धग, माहेरचा आहेर, गड जेजुरी, आम्ही दोघे राजा राणी, बाईसाहेब, मानाचं कुंकू मानाचा मुजरा इत्यादी आहेत. तसेच रंगभूमीशी सतत संलग्न राहून तुझं आहे तुझ्या पाशी, कथा अकलेच्या कांद्याची, बेल भंडार, सुनबाई घर तुझंच आहे, राजकारण गेलं चुलीत, चिरंजीव आईस, सासूबाईंचं असंच असतं, लग्नाची बेडी अशा नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी केले आहेत.