
माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरेंना तहसीलदारांकडून नोटीस
रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळील रिळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी समुद्रकिनारी केलेले बांधकाम आणि वाळू उत्खननाविरोधी आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणी प्रवीण आमरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्या नोटीसीच्या खुलाशानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.रिळ येथील बांधकाम अनधिकृत आणि बेकायदेशीर वाळू उपसा केल्याचा ठपका प्रवीण आमरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरीच्या तहसीलदारांनी आमरे यांना दिलेल्या नोटीसीमध्ये तेथील ग.नं. ६४४ क्षेत्र ०.०४.० हे.आर. चौ.मी. या मिळकतीमध्ये चिरेबंदी कुुंपणाचे अनधिकृत बांधकाम केले असल्याबाबत चाफेरी तलाठी यांनी तहसीलदार कार्यालयास कळवले आहे. चाफेरी तलाठी यांच्या अहवालावरून रिळ येथील मिळकतीमध्ये ४३.७० बाय १५.६० मी. लांबी रूंदीचे चिरेबंदी कुंपणाचे अनधिकृत बांधकाम केले आहे.www.konkantoday.com