कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहात सामंजस्य करार उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा- उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.२५ : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार होणार आहे. उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा होईल, असे उद्योमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूह संचलित कौशल्यवर्धन केंद्रासाठी एम. डी. नाईक हॉल येथे एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूह यांच्यात सामंजस्य करार झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, टाटा टेक्नॉलॉजीस लि, पुणे चे वरिष्ठ उपाध्यक्ष पी. व्ही. कौलगुड, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचीन राक्षे, शिरगाव सरपंच फरिदा काझी आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरीसाठी आजचा महत्वाचा दिवस आहे. टाटा समूहाबरोबर सामंजस्य करार करुन २०० कोटी रुपये खर्चुन हे सेंटर होत आहे. ही परवानगी टाटा समूहाच्या मॅनेजमेंटने दिली म्हणून रत्नागिरीकरांच्यावतीने आपण आभार मानतो, धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम हा शिरगाव येथे होत असल्याने शिरगाव ग्रामपंचायतीचे नाव कौशल्य क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून ठेवले जाईल. नवीन टेक्नॉलॉजी वापरुन ही इमारत उभारण्यात येणार आहे. एकूण प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के खर्च महामंडळाकडून करण्यात येणार आहे.जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे अभियांत्रिकी, रासायनिक व फळ प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. या औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा करणे, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार करणे तसेच रोजगार क्षमता वाढविणे आणि एमएसई ना पाठिंबा देणे याकरिता कौशल्यवर्धन प्रशिक्षण केंद्र उभारणे येत आहे. कुशल मनुष्यबळाची तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, स्थानिक कुशल मनुष्य बळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती, उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक पूल उपलब्ध करणे, स्थानिक रोजगार क्षमता वाढवणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या CIIIT सेंटर द्वारे पाठिंबा देणे. या हेतूने हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी आणि टाटा टेक्नॉलॉजीज लि, पुणे चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. कौलगुड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाआधी एमआयडीसी व टाटा उद्योग समूह संचलित कौशल्यवर्धिनी केंद्राचे भूमीपूजन आज प्लॉट नं.१९५, एमआयडीसी, झाडगाव ब्लॉक येथे उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button