महामुंबई गंडाप्रकरणी आणखी एकाची नऊ लाखाची फसवणूक
राजापूरात महामुंबई नामक बँकेने चार जणांना साडेआठ लाखाचा गंडा घातल्याची तक्रार राजापूर पोलिसात झालेली असताना आता आणखीन एका तक्रारदाराने या बँकेकडून ९ लाख १० हजार रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मनेश सखाराम कांबळे (रा. सोलगाव, ता. राजापूर) असे या तक्रारदाराचे नाव आहे.मोठया परताव्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याप्रकरणी महामुंबई निधी अर्बन बँक शाखा राजापूरचे मंगेश महादेव जाधव, सागर रिकामे, मयुर पाटील (सर्व रा. ९ मुंबई) यांच्या विरोधात राजापूर पोलीसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे ३१६(२), ३१८ (४), ३ (५) सह महा. ठेवी संस्था वित्तीय आस्थापणा मधील हितसंबंध रक्षण अधिनियम १९९९ चे कलम ८,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान संशयीत तिघांनी महामुंबई बँकेत गुंतवणुक केली तर जास्त परताव्याचे आमिष तक्रारदार व इतर गुंतवणुकदार यांना दाखवले होते. त्यांचेकडून वेळोवेळी गुंतवणुक स्विकारली. त्यानंतर परतावा न मिळाल्याने फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधीक तपास राजापूर पोलीस करीत आहेत.