कोर्टाला शेवटची विनंती करतो नाहीतर उद्या कोर्टाचा नाद सोडतो”; उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठं विधान!
” पुणे : सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आता याच याचिकांवर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या ६ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची तारीख एकाच दिवशी दर्शवण्यात आली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोर्टाला विनंती केली आहे.*पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. “शिवसैनिक वकील आहे. जनता न्यायाधीश आहे. तिथे तुमची बाजू मांडा. जनतेच्या न्यायालयातील सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे जनता आपला निकाल देईल. विश्वास आहे. कोर्टाला विनंती केली आहे. आम्ही आता शेवटची विनंती करतो. नाही तर आम्ही नाद सोडतो”, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.“आमचं हिंदुत्व हे साधूसंतांचं आहे. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आम्ही हर हर महादेव म्हणणारे आहोत. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता. पण औरंगजेबाचे पाय चाटत होता. तसेच गद्दार आपल्याकडून तिकडे गेले. गद्दारांनीच घात केला. त्याही काळात मिर्झा राजे प्रचंड समुद्रासारखे सैन्य घेऊन आला होता. या राजाचा जीव सिंहासनात नाही तर रयतेत अडकलेला आहे हे त्याला कळलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात न लावणारा हा राजा आहे, हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने रयतेची कत्तल सुरू केली. त्यामुळे महाराजांकडे पर्याय नव्हता. त्यामुळे ते शरण गेले. आग्र्याला गेले. परत आले. तेव्हा काहीच नव्हतं. राज्य नव्हतं, गड किल्ले नव्हते. पक्ष चोरला चिन्ह चोरलं वडिलांचा फोटो चोरला. तरीही त्यांनी औरंगजेबाच्या छाताडावर उभं राहून त्यांनी भगवा रोवला आणि जिंकले. आपण हे करू शकत नाही. ती जिद्द आपण घ्यायला पाहिजे. म्हणूनच आपण महाराजांची पूजा करत असतो”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.*आता शेवटची विनंती करतो, नाही तर नाद सोडतो*“शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. हा निखारा आहे. निखाऱ्याची जबाबदारी सांभाळणं कठीण असते. जी मशाल अन्याय जाळू शकते, त्यामुळे आपण मशाल चिन्ह निवडलं आहे. येत्या ५ ते १० किंवा ५० वर्षात निकाल नक्की लागेल. तो निकाल लागेल तेव्हा लागेल. पण मी जनतेच्या न्यायालयात आलो आहे. शिवसैनिक वकील आहे. जनता न्यायाधीश आहे. तिथे तुमची बाजू मांडा. जनतेच्या न्यायालयातील सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे जनता आपला निकाल देईल. विश्वास आहे. कोर्टाला विनंती केली आहे. आम्ही आता शेवटची विनंती करतो, नाही तर आम्ही नाद सोडतो”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.*“तुम्ही लाच देऊन मत मागताय”*“लोकशाही फक्त शिवसेनेची लढाई नाहीये. उद्या त्यांना अपात्र ठरवलं तरी उद्या ते निवडणूक लढू शकतात. मग आम्हाला कुठे न्याय मिळाला. पण तुमच्याकडे आम्ही आशेने पाहतो. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करणारे खूनी आमच्यावर राज्य करत असतील तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा. मी जनतेकडेच न्याय मागणार. गद्दारांनी चोरबाजार मांडला आहे. आता रेवड्या उडवत आहेत. लुटालुट सुरू आहे. कंत्राटावर कंत्राट देत आहेत. पैसा उभा करत आहेत. हाच पैसा निवडणुकीत वापरणार आहे. लाडकी बहीण करून तुम्ही लाच देऊन मत मागत आहात. लाज वाटली पाहिजे”, असाही घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.