
ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचा फार्मूला
*_महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या बैठकीला अद्याप सुरुवात झाली नसली तरी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या याच्या ढोबळ सूत्रावर प्राथमिक चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु झाली आहे.लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०० आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने ८० जागा लढवाव्यात, या सूत्रावर चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी हा फॉर्म्युला मविआसमोर ठेवला असून त्याआधारे पुढील चर्चा होणार असल्याचे समजते. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असेल, असा सोपा मार्ग पवारांनी मविआला दाखवत पुढील वाद टळावेत यासाठी फॉर्म्युला केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची १५ सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतदेखील पावसाची शक्यता आहे. प्रचारात पावसामुळे अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे मविआचा कल आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिन्ही पक्षांनी त्रयस्थ संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले आहेत.