आता मुख्यमंत्र्यांनीही पेटारा उघडला, ऑलिम्पिक पदकवीर स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचं इनाम जाहीर!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेचा आता राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.स्वप्निलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला शुभेच्छा तर दिल्या शिवाय वैयक्तिकरित्या फोन करून त्याचं अभिनंदनही केलं. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यावर कौतुकांचा आणि बक्षिसांचा देखील वर्षाव करण्यास सुरूवात झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वप्निल कुसाळेचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं. हे पदक महाराष्ट्रासाठी खास आहे. कारण 1952 साली खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये, कुस्तीत ऐतिहासिक ब्राँझ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रासाठी अशी भरारी घेतलीय ती कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने अन् तीही तब्बल 72 वर्षांनी.