आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका दुर्दैवी -प्रकाश आंबेडकर
_राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत की विरोधात, हे त्यांनी स्पष्ट केलं नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आरक्षणाच्या संदर्भातली शिवसेनेची भूमिका दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी आहे. आरक्षण मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात? हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल.”