राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे १० ऑगस्टला वृक्षारोपण
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी वाटूळ (ता. राजापूर) ते दाभोळ (संगमेश्वर) राज्य मार्गावरील व्हेळ – विलवडे भाग (ता. लांजा) येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना लक्षावधी झाडांची कत्तल करण्यात आली. त्या मार्गावर अजूनही झाडे लावण्यात आलेली नाहीत. मात्र दहा वर्षांपूर्वी झालेल्या वृक्षतोडीमुळे कोकणातील पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते भरून काढण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून राजापूर लांजा तालुका नागरिक संघ वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी राबवत आहे. यावर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. वड, पिंपळ, आंबा, जांभूळ अशा कोकणात होणाऱ्या स्थानिक जातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे, लागवडीनंतर लगेचच प्रत्येक झाडाला कुंपण करण्यात येणार आहे, त्यामुळे मोकाट जनावरांपासून झाडांचे रक्षण होणार आहे. झाडे लावल्यानंतर उन्हाळ्यात चार महिने त्या झाडांना पाणी घालण्याची व्यवस्थाही स्थानिक लोकांच्या साह्याने संघातर्फे करण्यात येणार आहे.वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन व्हेळ येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयात व्हेळ – १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. त्यानंतर एकाच वेळी ५०० ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमात आरगाव (ता. लांजा) येथील समर्थ नर्सरीने वृक्षपालकत्व स्वीकारले आहे. रुक्मिणी भास्कर विद्यालय, लांजा सीनियर कॉलेजचे एनएसएस विद्यार्थी, लांज्यातील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, व्हेळ, विलवडे, वाघणगाव आणि वाटूळ ग्रामपंचायत, व्हेळ आणि विलवडे येथील प्राथमिक शाळा, विलवडे रेल्वे प्रवासी संघटना (मुंबई ग्रामीण), विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना लांज्यातील अपना बाजार, तांबे उपाहारगृह, डॉक्टर्स असोसिएशन आणि ज्येष्ठ नागरिक संघटना सहभागी होणार आहेत. राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा हा कार्यक्रम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन प्रायोजित करणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी सहभागी संस्थांच्या वतीने केले आहे.