चिपळूण रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीला थांबा मिळावा-आमदार शेखर निकम यांची मागणी
*_चिपळूण रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी निवेदनाद्वारे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात १०० कि.मी.च्या आत थांबे दिले आहेत. वंदे भारत या गाडीला खेड येथे थांबा दिला आहे. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे कौतुक आहे; परंतु चिपळूण येथे वंदे भारत गाडीला थांबा देण्यात आला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चिपळूण रेल्वेस्थानक हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख मध्यवर्ती रेल्वेस्थानक असून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, चिपळूण व खेड तालुक्यातील चिपळूण शहरालगतच्या गावातील असंख्य प्रवासी चिपळूण रेल्वेस्थानकावरून प्रवास करतात. चिपळूण शहरालगत असणाऱ्या विविध औद्योगिक कंपन्यांमुळे व पर्यटन क्षेत्रामुळे चिपळूणशहरालगत असणाऱ्या विविध औद्योगिक कंपन्यांमुळे व पर्यटन क्षेत्रामुळे चिपळूण रेल्वेस्थानक हे व्यापार, उद्योग व पर्यटनासाठी एक महत्वाचे रेल्वेस्थानक आहे. चिपळूण रेल्वेस्थानकांवर गाड्यांना पाणी भरून दिले जात असल्याने या रेल्वेस्थानकाला महत्व आहे. वंदे भारत ही गाडी चिपळूण रेल्वेस्थानकात न थांबल्यास या परिसरातील असंख्य नागरिक लांब पल्ल्याच्या जलद प्रवासापासून वंचित राहणार आहेत.