
श्रीराम मंदिर कट्ट्या तर्फे 27 जुलै रोजी भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा, विश्वनाथ भाटेबुवा करणार मार्गदर्शन
रत्नागिरी दि. २२ (प्रतिनिधी) : येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने मासिक भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा येत्या शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ३ ते ५ वाजता या वेळेत संपन्न होणार आहे. या मेळाव्यात उमरे येथील प्रसिद्ध भजनी बुवा श्री. विश्वनाथ भाटे हे भजनी कलावंतांना शास्त्रोक्त पद्धतीने भजनी गीते कशी सादर करावी, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आजवर त्यांनी केलेल्या मार्गदर्शन मेळाव्याला भजनी कलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. येत्या श्रावण महिन्यात विविध मंदिरातून भजनी सप्ताह संपन्न होणार असून त्या पार्श्वभूमीवर यावेळच्या भजनी कलावंत मेळाव्याला विशेष महत्त्व असणार आहे. तरी भजनी कलावंतांनी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश तथा अण्णा लिमये आणि सचिव समाजभूषण श्री. सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.