
मुंबईत काही भागात गेल्या सहा तासात तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद, सकाळच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी
*मुंबई शहर आणि परिसरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांबाबत महापालिका प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.मुंबई शहरात आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे