महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार आहे. कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरवू, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने खळबळ
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून 9 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.ही निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे. 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच निवडणूक बिनविरोध होईल. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपले सर्व उमेदवार जिंकून येणार असा दावा होत असताना आता मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीबाबत उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीचे सगळे उमेदवार जिंकणार आहेत. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार आहे. कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरवू, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.