सरपंचाच्या घरातील चोरीचा काही तासातच छडा
मंडणगड तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच करीना कल्पेश रक्ते यांचे टाकवलीी गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व २ हजार रुपयांचा मोबाईल लांबवल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ६ वा. उघडकीस आली. मात्र या चोरीनंतर मंडणगडातून पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या अंकुश दौलत रेवाळे (४२, रा. टाकवली) या संशयित आरोपीस काही तासातच पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.पोलिसांच्या माहितीनुसार करीना रक्ते या गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपले घर बंद करून गावातील शेतात शेतीकामासाठी निघून गेल्या होत्या. सायं. ६ च्या सुमारास त्या घरी आल्या असता घरासमोरील दरवाजा त्यांना उघड्या अवस्थेत तर दरवाजाचे कुलूप तोडून खाली टाकलेले दिसले. त्यांनी घरात आत जावून पाहिले असता कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ६० हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने व २ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मंडणगड पोलीस ठाणे गाठले व आपली तक्रार दाखल केली. www.konkantoday.com