चिकन खाताना ठसका लागला, चिकनचे हाड घशात अडकल्याने गंभीर झालेल्या रूग्णावर डेरवण रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
कान, नाक व घसा यामध्ये फॉरेन बॉडी अडकलेल्या रूग्णांसाठी चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल तारणहार ठरत आहे. या हॉस्पिटलमध्ये नुकतीच अशी एक यशस्वी शस्त्रक्रिया गुहागर येथील ७४ वर्षाच्या महिलेवर करण्यात आली. त्यांच्या घशात चिकनचे मांस व हाडाचे तुकडे अडकले होते. या उपचारानंतर त्या महिला आता ठणठणीत होवून घरी परतल्या आहेत.गुहागर येथील एका ७४ वर्षाच्या महिलेच्या घशात दुपारी जेवत असताना ठसका लागून चिकनचे मांस व हाडाचा तुकडा अडकला. त्यामुळे तिला गिळताना त्रास होत होता. घसा दुखत होता. पाणी देखील पिता येत नव्हते व बोलताना देखील घसा दुखत होता. त्यासाठी तिने दिवसभर जवळपासच्या तसेच चिपळूण येथील डॉक्टरांना दाखवले पण तिला काही दिलासा मिळाला नाही. शेवटी रात्री ९ वाजता म्हणेजच जवळपास सात तास हा त्रास सहन केल्यावर ती डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये आली. तिथे त्यांना वालावलकर हॉस्पिटलमधील ई.एन.टी. सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी तपासले व त्यांचा एक्स रे काढण्यात आला. त्या एक्स रे नुसार डॉ. प्रतीक शहाणे यांना तो चिकनच्या मांसाचा घास हा अन्ननलिकेच्या सुरूवातीला व स्वरयंत्राचया मागे अडकला आहे हे समजले. व त्यांनी त्यासाठी दुर्बीणीद्वारे ऑपरेशन करून काढण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यानुसार ईमर्जन्सीमध्ये जवळपास रात्री ११.३० च्या सुमारास डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतीक शहाणे यांनी त्या महिलेचे ऑपरेशन करून अडकलेले चिकनचे मांस व हाडाचा घास काढला. त्यानंतर त्यांना एक दिवस आय.सी.यु.मध्ये ऑब्जर्वेशनसाठी ठेवण्यात आले व लगेच दुसर्या दिवशी ठणठणीत होवून त्या घरी परतल्या आहेत. हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी वालावलकर हॉस्पिटलचे भूलतज्ञ डॉ. ऋषिकेश येलगुडकर, डॉ. रेवती, डॉ. केयूर, तसेच हॉस्पिटल स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले. www.konkantoday.com