
आकले आणि कादवड गावांना जोडणारा पादचारी लोखंडी पूल चोरीला गेल्याची युवा नेते सिद्धेश शिंदे यांचा दावा
चिपळूण तालुक्यातील आकले आणि कादवड या दोन गावांना जोडणारा पादचारी लोखंडी पूल चोरीला गेला असल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरचे प्रकरण युवा नेते सिद्धेश शिंदे यांनी उघडकीस आणले असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शासकीय स्तरावर केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कादवड ग्रामपंचायत आणि आकले ग्रामपंचायत या हद्दीवरील पादचारी लोखंडी पूल हा सन २०२१ च्या महापुरामध्ये वाहून नदीमध्ये अडकला होता, परंतु साधारण सन २०२३ अखेरपर्यंत नदीमध्ये होता. त्यानंतर तो पादचारी लोखंडी पूल नदीमध्ये नसल्याने चोरीला गेल्याचे निदर्शनास दिसून येत आहे. त्यानुसार सिद्धेश शिंदे यांनी वारंवार पंचायत समिती यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सदरच्या पुलाबाबत एका ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत ठराव होवून रितसर पाच हजार रुपये घेवून एका भंगार व्यावसायिकाला तो विकला गेल्याची गोपनीय माहिती समोर येत आहे. याबाबत संबंधित ग्रामसेवक यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. मात्र भंगार व्यावसायिकाने पूल आपण पाच हजार रुपयांमध्ये विकत घेतला असल्याचे सांगितले. तसा पुरावा सिद्धेश शिंदे यांच्याकडे उपलब्ध आहे. याबाबत सिद्धेश शिंदे यांनी पंचायत समितीच्या बीडीओ यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे. याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.www.konkantoday.com