
भर उन्हाळ्यात वीज निर्मितीवर परिणाम, कोराडीनंतर चंद्रपूरमधीलही एक वीज निर्मिती संच बंद
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक वीज निर्मिती संच नुकताच बंद पडला होता. त्यापाठोपाठ आता चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही एक वीज निर्मिती संच बंद पडल्याने महानिर्मितीच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे तुर्तास विजेची मागणी कमी आहे. परंतु अधून- मधून विजेची मागणी अचानक वाढते. त्यामुळे गरजेनुसार वीज निर्मिती वाढवण्याचे आवाहन वीज कंपन्यांवर असते. त्यातच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा वीज निर्मिती संच क्रमांक ८ हा बॉयलर ट्यूब लिकेजमुळे १४ मे रोजी बंद पडला होता. हा संच अद्याप सुरू झाला नाही.दरम्यान १७ मेच्या रात्री चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही ५०० मेगावॉटचा संच क्रमांक ६ बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला. भर उन्हाळ्यात महानिर्मितीचे दोन महत्वाचे वीज निर्मिती संच बंद पडल्याने कंपनीच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, राज्यात १८ मे रोजी दुपारी १.४५ वाजता विजेची मागणी २६ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यापैकी महावितरणची मागणी २२ हजार २२० मेगावॉट तर मुंबईची मागणी ३ हजार ७०१ मेगावॉटच्या जवळपास होती. सध्या विजेची मागणी कमी आहे. परंतु अचानक मागणी वाढल्यास पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या विषयावर महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, एक ते दोन दिवसांत दोन्ही संचांची दुरूस्ती होणार आहे.www.konkantoday.com