माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात सुमारे १२ टक्के वाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात सुमारे १२ टक्के वाढ केली आहे. आता दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० रुपये भरावे लागणार आहेत.या परीक्षा शुल्कासोबतच विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही काही रक्कम भरावी लागणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यात दरवर्षी फेब्रुवारी/मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै/आॅगस्ट महिन्यातही या परीक्षांचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ केली होती. त्यानंतर आता बोर्डाने पुन्हा एकदा परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व विभागीय सचिवांना या सुधारित परीक्षा शुल्काबाबत कळविले आहे. सुधारित शुल्क आपल्या स्तरावरुन सर्व शाळा, महाविद्यालयांना अवगत करावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या पत्रात म्हटले आहे.दहावी, बारावीचे वाढीव परीक्षा शुल्क जुलै/आॅगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षांपासूनच लागू असणार आहे. शासन आदेश आणि कार्यकारी परिषद सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी हे सुधारित परीक्षा शुल्क लागू असेल, असे राज्य मंडळाने आपल्या पत्रात म्हटले आहे.www.konkantoday.com