रत्नागिरी येथे खोल समुद्रात बुडालेले दोन मासेमारी ट्रॉलर समुद्रा बाहेर काढण्यात मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सना यश
रत्नागिरी येथे खोल समुद्रात बुडालेले दोन मासेमारी ट्रॉलर समुद्रा बाहेर काढण्यात मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सना यश आले आहे. बुडालेल्या दोन्ही ट्रॉलर्स सोबत असलेलें भले मोठे जाळे वेगळे करणे अतिशय जोखमीचे काम होते. स्कुबा ड्रायव्हर्सनी आपले पाण्यातील कसब पणाला लावत समुद्रात बुडालेले जाळे आणि ट्रॉलर्स मालकांना परत मिळवून दिले आहे. पाण्याचा प्रवाह आणि अतिशय कमी दृश्यमानतेत ही कामगिरी बजावल्या बद्दल मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाचे मच्छिमारांकडून मोठे कौतुक होत आहे. रत्नागिरी मिरकरवाडा येथील जुबेर खान यांच्या मालकीचा सी लाईन हा ट्रॉलर्स ३० वाव खोल समुद्रात तर मंगळवारी जयगड समुद्रात दुसरा ट्रॉलर्स बुडाल्याची घटना घडली होती. किमती जाळ्या सह पंधरा दिवसात रत्नागिरी येथे दोन ट्रॉलर्स समुद्रात बुडाले होते. यात दोन्ही ट्रॉलर्स मालकांचे मोठे नुकसान झाले. रत्नागिरी येथे खोल समुद्रात ट्रॉलर्स बुडाल्याची माहिती मिळताच किनारपट्टीवर धावाधाव झाली. दोन्ही वेळी हे ट्रॉलर्स समुद्रा बाहेर काढण्यासाठी मालवण येथील स्कुबा डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. बुडालेल्या ट्रॉलर्स सोबत असलेले जाळे समुद्राच्या पाण्यात जावून सोडविणे मोठे जिकिरीचे काम होते. सुमारे ६० फूट खोल समुद्रात उतरत जाळे आणि ट्रॉलर्स वेगळे करताना पाण्याचा प्रवाह आणि कमी दृष्यमानतेचा आम्हाला सतत सामना करावा लागला, असे या पथकातील स्कुबा डायमास्टर असलेले समिर गोवेकर म्हणाले. समुद्रातील दोंन्ही मोहिमांमध्ये सतत दोन ,दोन दिवस समुद्रात राहिल्यामुळे आमची त्वचा खराब झाली. तसेच यावेळी समुद्रातील जेलिफिश आणि अन्य धोके स्वीकारत आम्ही हे आव्हान पूर्ण केल्याचे गोवेकर पुढे म्हणाले. बुडालेले ट्रॉलर्स बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी येथे गेलेल्या मालवण येथील स्कुबा डायव्हिंग क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ञ स्कुबा डायव्हर्स नूपुर पराडकर, यतीन मेथर, प्रथमेश आढाव, समिर गोवेकर, सुजित मोंडकर, वैभव खोबरेकर, छगन सावजी यांनी यांसह अन्य खलाशांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.www.konkantoday.com