काजू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा कधी समजून घेणार?
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्येही प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, या दरम्यान, सावंतवाडीमध्ये लागलेल्या एका बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कोकणात सध्या काजू उत्पादनाचा हंगाम सुरू असून, काजू बियांना मिळणारा कमी दर हा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. आफ्रिकेतून आयात केल्या जाणाऱ्या काजू बियांमुळे स्थानिक काजूंचे दर पडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कमी दरामुळे संतापलेल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांनी हा बॅनर लावला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये अनेक गावांत काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र मागच्या काही वर्षांपासून काजूचे दर सातत्याने घटत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. त्या संतापामधूनच हा बॅनर लावण्यात आला असून, त्यामध्ये २०१९ आणि २०२४ मध्ये असलेल्या काजूच्या दरांची तुलना करण्यात आली आहे. त्यानुसार २०१९ मध्ये १६० रुपये किलो असलेल्या काजू बियांचा दर २०२४ मध्ये अवघ्या ११५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा कधी समजून घेणार? असा सवाल या बॅनरमधून विचारण्यात आला आहे.आफ्रिकन काजू बीवरील आयात कर कमी करणाऱ्या आणि मागच्या ५ वर्षांत काजू बी दराच्या प्रश्नावर एकदाही आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनो तुम्हाला भारतीय काजू उत्पादक शेतकऱ्यांची गरज नसेल तर आता शेतकऱ्यांनाही तुमची गरज नाही. इथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूसोबत तिथल्या शेतकऱ्यांची मतेही आयात करा, असा उद्विग्न सल्ला या बॅनरमधून काजू उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.www.konkantoday.com