
चिकनच्या पैशावरून वाद चिघळला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायाची भोसकून हत्या
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून आणि डोक्यात रॉड मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना मुलुंड पश्चिमेत घडली आहे.पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पाच जणांना या प्रकरणी अटक केली आहे. चिकन तंदुरीचे २०० रुपये देण्यावरून झालेल्या भांडणातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.अक्षय नार्वेकर (३०) असे हत्या करण्यात आलेल्या शिपायाचे (प्युन) नाव आहे. त्याचा मित्र आकाश हा गंभीररित्या जखमी झाला आहे. अक्षय हा ठाण्यातील किसन नगर, वागळे इस्टेट येथे राहण्यास असून त्याचा मित्र आकाश हा मुलुंड पश्चिम वैशाली नगर परिसरात राहणारा आहे. अक्षय हा रविवारी दुपारी ठाण्यातील किसन नगर येथील इम्रान खान याच्या चिकन सेंटर येथे चिकन तंदुरी घेण्यासाठी गेला होता, त्याने तंदुरी घेतल्यानंतर इम्रानने तंदुरीचे २०० रुपये मागितले होते,अक्षयने रोख पैसे नसल्याचे सांगून नंतर देतो असे इम्रानला सांगितले, परंतु इम्रानने त्याला आताच पैसे पाहिजे म्हणून अक्षय सोबत वाद घातला,अक्षयने त्याला २०० रुपये गुगल पे वर पाठवून तात्पुरता वाद मिटवला.दरम्यान सायंकाळी अक्षय आणि आकाश हे मुलुंड पश्चिम वैशाली नगर येथे इम्रानचा भाऊ सलीम याच्या चिकन सेंटर येथे गेले, त्या ठिकाणी इम्रान देखील आला होता. दुपारच्या तंदुरीच्या पैशावरून झालेला वाद पुन्हा उफाळून आला व सलीम आणि इम्रान यांनी अक्षयला मारहाण केली, स्थानिकांनी वाद मिटवून अक्षयला तेथून जाण्यास सांगितले.अक्षय आणि आकाश काही अंतरावर जाताच सलिम आणि इम्रान हे दोघे भाऊ आणखी तिघांना घेऊन त्या ठिकाणी आले व पाचही जणांनी अक्षय आणि आकाशला मारहाण करण्यास सुरुवात केली, सलीमने सोबत आणलेल्या चाकूने अक्षय आणि आकाश याच्यावर वार केला आणि इम्रानने अक्षय च्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून पाचही जणांनी तेथून पळ काढला.याघटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो पर्यत जखमींना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आले होते, डॉक्टरांनी जखमी दोघांपैकी अक्षयला मृत घोषित केले व आकाशवर प्राथमिक उपचार करून सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेwww.konkantoday.com