खैराची लाकूड वाहतूक करणार्या एक लाखाच्या खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा, खेडमधील प्रकार
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातून पालघर जिल्ह्यातून सावर्डे येथे वनविभागाच्या परवानगीने खैराची लाकूड वाहतूक करणार्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी जितेश एकनाथ कोळी (३७) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे न दिल्यास ट्रक सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत फैयाज अहमद महिउल्ला खान (२३) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मोहम्मद कय्युम इस्लाम हा आपल्या ताब्यातील लेलँड कंपनीच्या एम.एच. १६/ सीसी ३९४२ क्रमांकाच्या १२ टायर ट्रकमधून वनविभागाच्या परवानगीने खैराचे लाकूड सालीसह वाहतूक करत होता. त्याच्या समवेत फिर्यादीदेखील होते. हा ट्रक भोस्ते घाटात आला असता संशयिताने ट्रकला ओव्हरटेक करत दुचाकी आडवी उभी करून ट्रक थांबविण्यास सांगितले. यावेळी संशयिताने ट्रकमधील मालाबाबत विचारणा करून त्याच्याकडे असलेल्या मालवाहतूक पासची मागणी केली. फिर्यादी यांनी संशयित हा वनविभागाचा असावा, असा समज झाल्याने खैर वाहतुकीचा पास दाखवला. त्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये ट्रकचे फोटो काढून ट्रकचे मालक ओव्हरलोड असल्याचे सांगत अवैध वाहतूक करत असल्याचे सांगून एक लाख रुपये मागितले. ही रक्कम देण्यास फिर्यादीने नकार दिल्यानंतर तुझा ट्रक सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. www.konkantoday.com