सिडकोला कोकणात पाऊलही ठेवू द्यायचे नाही-खासदार विनायक राऊत

*कोकणातील जमिनी, जांभा दगड, किनारपट्टीवरील गावे, साधनसामग्री हडपणे तसेच आंबा-काजूंची उत्पादने नष्ट करण्याचा डाव आम्ही कधीच साध्य होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दिला.पावस येथे आयोजित इंडिया आघाडी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार राऊत म्हणाले, पावस-गोळप गटातील २६ गावे सिडकोच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. या गावांमधील हजारो हेक्टर जमीन सिडकोच्या नियंत्रणात जाणार आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा. सिडकोला कोकणात पाऊलही ठेवू द्यायचे नाही, असा निर्धार सर्वांनी केला पाहिजे. ४ मार्चला शिंदे सरकारने एक परिपत्रक काढून कोकण सिडकोच्या नियंत्रणाखाली आणला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ७५२ गावे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८४ गावे ही सिडकोच्या नियंत्रणाखाली आली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील गावे तसेच जांभा दगडाच्या खाणी यावर आता सरकारची नजर आहे. या परिपत्रकाद्वारे कोकणातील जांभा दगडांच्या खाणी नियंत्रणात आणण्याचा, ताब्यात घेण्याचा हा डाव आहे. येथील एक जांभा दगड हा २० ते ३० रुपयाच्या दरम्यान विकला जातो. याच एका जांभा दगडाची किंमत ही सौदी अरेबियात साडेचारशे रुपये आहे. त्यामुळे दगडाच्या खाणी या सोन्याच्या खाणी आहेत, हे ओळखून सिडकोच्या नियंत्रणाखालून त्या हडपण्याचा डाव आहे. तो यशस्वी होऊ देणार नाही तसेच सिडकोला कोकणात पाऊलही ठेवू देणार नाही. रिफायनरी प्रकल्प लादण्याचाही असाच सरकारने प्रयत्न केला होता. आम्ही हा प्रकल्प लादलेला नाही,त्याला विरोध केला आणि त्यासाठी रस्त्यावरती लढाई आम्ही लढत आहोत. न्यायालयातील लढाईही सुरू आहे.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, सचिव बशीर मुर्तुझा उद्धव ठाकरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, संजय साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर आदी उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button