मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामधील जाहिरातीचे प्रमाणिकरण बंधनकारक -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि.१२ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये प्रसिध्द करावयाची जाहिरात राज्य अथवा जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व-प्रमाणित करणे बंधनकारक आहे, अशी सूचना 46- रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यानी दिली.
मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस पूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने 1 एप्रिल रोजीच्या पत्राद्वारे दिले आहे. कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य अथवा जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये. राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंटमीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडे अर्ज करावा लागेल. याचे काटेकार पालन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.000