
कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर
कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर ठाकरेंकडून वैशाली दरेकर यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस नागपूरला पोहोचले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.*देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?*“भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबरीपणे उभा राहणार आहे. तीन पक्ष सोबत असल्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणे हे महत्त्वाचे आहे. तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा लढल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न होता. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळीपेक्षा जास्त मतांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे त्यांना निवडून आणू,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.*भाजप कार्यकर्त्यांचा श्रीकांत शिंदेंना विरोध*कल्याण लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा उमेदवार असेल तरच काम करू, अशा प्रकारची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही भूमिका घेण्यात आली होती. मात्र भाजपचे स्थानिक नेते श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीस विरोध करत असताना फडणवीस यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. www.konkantoday.com